Breaking

Post Top Ad

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

कहर: सोमवारी ७९ जण पाॅझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

कहर: सोमवारी ७९ जण पाॅझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

पांढरकवडा, पुसद, दिग्रस येथील बाजारपेठ मंगळवार पासून उघडणार
यवतमाळ,दि. २ ऑगस्ट : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युमध्ये तीन जणांची भर पडल्याने आतापर्यंत एकूण मृत्युची संख्या ३२ झाली आहे. तर जिल्ह्यात आज (दि. ३) ७९ नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटर मध्ये भरती असलेले आठ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

सोमवारी आर्णीत झालेली गर्दी
सोमवारी मृत झालेल्या तीन जणांमध्ये यवतमाळ शहरातील कुभारंपुरा येथील ६६ वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील महादेव नगर येथील ७५ वर्षीय पुरुष आणि पुसद शहरातील प्रभात नगर येथील ७४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.३ ) पॉझिटीव्ह आलेल्या ७९ जणांमध्ये ३६ पुरुष व ४३ महिलांचा समावेश आहे. यात पुसद शहरातील खतीब वॉर्ड येथील दोन पुरुष, पुसद शहरातील गणेश वॉर्ड येथील एक पुरुष, वॉर्ड क्रमांक १ येथील एक महिला, पुसद शहरातील पाच पुरुष व पाच महिला, पुसद तालुक्यातील पारडी येथील एक महिला, श्रीरामपुर येथील एक पुरुष, मारेगाव तालुक्यातील काळी दौलत येथील एक महिला, पांढरकवडा शहरातील १३ महिला व नऊ पुरुष, पांढरकवडा शहरातील वैभव नगर येथील एक महिला, यवतमाळ शहरातील एक पुरुष व दोन महिला, यवतमाळ शहरातील अवधूतवाडी येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील काळे ले-आऊट, वडगाव येथील एक महिला, यवतमाळ शहरातील विश्वकर्मा नगर, पिंपळगाव येथील पुरुष, जामा मशीद वॉर्ड येथील एक पुरुष, राळेगाव शहरातील एक पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील दोन पुरुष, दिग्रस शहरातील पाच पुरुष व आठ महिला, दिग्रस शहरातील पाटीपूरा येथील एक पुरुष, आर्णी शहरातील पाच पुरुष व नऊ महिला पॉझिटीव्ह आले आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या सुचनेवरून यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथील संचारबंदीत शिथिलता देण्याबाबत दोन दिवसांपूर्वी प्रशासनाला सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वरील शहरातील बाजारपेठ सकाळी ६ ते सायंकाळी ५ या वेळेत उघडण्यास मुभा देण्यात आली. याच धर्तीवर पांढरकवडा, दिग्रस आणि पुसद येथील संचारबंदीत शिथिलता देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी व्हीसीद्वारे प्रशासनाला दिले. त्यानुसार आता पांढरकवडा, पुसद आणि दिग्रस येथील बाजारपेठ मंगळवारपासून सकाळी ६ ते सायंकाळी ५ या वेळेत उघडी राहणार आहे.   

जिल्ह्यात रविवारपर्यंत ३९४ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण होते. यापैकी एकाचा मृत्यु झाल्याने हा आकडा ३९३ झाला. तर आज नव्याने ८१ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे हा आकडा ४७४ वर पोहचला. मात्र यापैकी आणखी दोन जणांचा मृत्यु आणि 'पॉझिटीव्ह  टू निगेटिव्ह' झालेल्या ८ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४६४ झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १२२६ झाली आहे. यापैकी ७३० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ३२ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १२६ जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत १९८६८ नमुने पाठविले असून यापैकी १५८७४ प्राप्त तर ३९९४ अप्राप्त आहेत. तसेच १४६४८ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, नेर, पांढरकवडा, पुसद, दिग्रस शहरात व या शहरालगतच्या परिसरात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथे रुग्ण संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आल्याने पालकमंत्री संजय राठोड यांनी लॉकडाउन संदर्भात जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतला होता. त्यानुसार येथे शिथिलता देण्यात आली. याच अनुषंगाने पांढरकवडा, पुसद व दिग्रस येथे सुध्दा संचारबंदी उठविण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे मागणी केली. या मागणीची दखल घेत अखेर पांढरकवडा, पुसद आणि दिग्रस येथील संचारबंदी उठविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad