माघ गुप्त नवरात्र २०२६ सुरू झाले असून २८ जानेवारीपर्यंत चालणार आहेत. मुहूर्त, पूजन विधी, धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व या संदर्भात जाणून घ्या.
माघ गुप्त नवरात्र २०२६ ची सुरुवात झाली असून हा पवित्र उत्सव २८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मात गुप्त नवरात्राला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असून या काळात देवी दुर्गेची गुप्त स्वरूपात उपासना केली जाते. विशेषतः साधक, उपासक आणि तांत्रिक साधनेसाठी हा कालावधी अत्यंत फलदायी मानला जातो.
माघ शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी १९ जानेवारी रोजी रात्री १ वाजून २१ मिनिटांपासून सुरू झाली असून ती २० जानेवारी रोजी रात्री २ वाजून १४ मिनिटांपर्यंत राहणार आहे. गुप्त नवरात्रात देवी दुर्गेच्या दहा महाविद्यांची उपासना केली जाते. यात महाकाली, तारा, त्रिपुरसुंदरी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुर भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या महाविद्यांचा समावेश आहे. या नवरात्रात बाह्य आवडंबर न करता अंतर्मुख साधना, मंत्रजप, ध्यान आणि तपश्चर्येला अधिक महत्त्व दिले जाते.
पूजनासाठी पहाटे ब्रह्ममुहूर्तात स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. पूजा स्थळी स्वच्छता करून लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. देवीची प्रतिमा किंवा चित्र स्थापित करून कलशस्थापना करावी. कलशात पाणी, आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो. त्यानंतर गणेशपूजन करून देवी दुर्गेची पूजा, मंत्रजप, दुर्गा सप्तशती किंवा चंडीपाठ केला जातो. पूजा अखेरीस आरती करून देवीकडे सुख, शांती, सामर्थ्य आणि बाधा निवारणाची प्रार्थना केली जाते.
गुप्त नवरात्राचे महत्त्व साधना आणि सिद्धीशी जोडलेले मानले जाते. या काळात केलेली गुप्त उपासना, तंत्रसाधना, हठयोग, जप, ध्यान आणि कठोर व्रतांमुळे साधकांना आध्यात्मिक प्रगती व विशेष फलप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे भाविकांसाठी माघ गुप्त नवरात्र हा अंतर्मुख होण्याचा आणि शक्ती उपासनेचा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो.
[ टीप - संबंधित माहिती धार्मिक श्रद्धा, पुराणकथा आणि लोकपरंपरांवर आधारित सर्वसाधारण माहिती आहे. यासंबंधीची सत्यता, अचूकता किंवा अधिकृतता याबाबत कोणताही दावा नाही.]
---------
