बिगुल वाजला ! 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान 2 तर निकाल 3 डिसेंबरला !


मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली असून या निवडणुका 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहेत. तर मतमोजणी आणि निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. या निवडणुका ईव्हीएम (EVM) यंत्रणेद्वारे घेतल्या जाणार आहेत. यासोबतच 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समित्या आणि 246 नगरपालिकांची मुदत संपल्याने पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकीसाठी राज्यभरात प्रशासन आणि राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

राज्य निवडणूक आयोगानुसार, या निवडणुकीसाठी एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यापैकी 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार आहेत. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी 13 हजार कन्ट्रोल युनिट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही ठिकाणी ‘गुलाबी मतदान केंद्रे’ (Pink Booths) स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर सर्व अधिकारी महिला असतील. तसेच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि बाळासह महिलांना प्राधान्याने मतदान करण्याची सोय दिली जाईल. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 32 वेगवेगळे प्रचार कॅम्पेन राबवले जात आहेत.

Maharashtra Local Body Elections 2025 – संपूर्ण वेळापत्रक:

नामनिर्देशन पत्र दाखल: 10 नोव्हेंबर

अंतिम मुदत: 17 नोव्हेंबर

छाननी: 18 नोव्हेंबर

अर्ज माघारी घेण्याची तारीख: 21 नोव्हेंबर

निवडणूक चिन्ह वाटप: 26 नोव्हेंबर

मतदान: 2 डिसेंबर

निकाल: 3 डिसेंबर

राज्यातील विभागनिहाय निवडणुकांची संख्या अशी असेल कोकण 17, नाशिक 49, पुणे 60, संभाजीनगर 52, अमरावती 45 आणि नागपूर 55.

यंदा उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

नगरपालिका उमेदवारांसाठी:

अ वर्ग: अध्यक्षपद – ₹15 लाख, नगरसेवक – ₹5 लाख

ब वर्ग: अध्यक्षपद – ₹11.25 लाख, नगरसेवक – ₹3.5 लाख

क वर्ग: अध्यक्षपद – ₹7.5 लाख, नगरसेवक – ₹2.5 लाख

नगरपंचायत उमेदवारांसाठी:

अध्यक्षपद – ₹6 लाख

नगरसेवक – ₹2.25 लाख

मतदारांच्या सोयीसाठी नवीन मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे. तसेच दुबार मतदान टाळण्यासाठी संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टारचे चिन्ह लावण्यात आले आहे. अशा मतदारांकडून दुसरीकडे मतदान करणार नाही असा लिखित दाखला घेतला जाईल.

ही निवडणूक फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची नसून, राज्यातील राजकीय पक्षांसाठी ही मोठी प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निकालावरून येणाऱ्या वर्षाच्या राजकीय समीकरणांचा अंदाज बांधला जाणार आहे.

                            ____________________________________

             

    






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने