Gunratna Sadavarte : "ब्राह्मणांनी काय पाप केलं? जरांगे यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांची टीका

 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी खुल्या प्रवर्गातील समाज, ब्राह्मण समाज आणि आरक्षण व्यवस्थेबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली.

Mumbai: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आणि आरक्षणाच्या मागणीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी खुल्या प्रवर्गातील समाजावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करत ब्राह्मण समाजाचाही उल्लेख केला.

पत्रकार परिषदेत बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, खुल्या वर्गातील विविध जातींवर आरक्षणाच्या धोरणाचा परिणाम होताना दिसत आहे. "विद्यार्थी हे पाकिस्तानी किंवा बांगलादेशी नाहीत. गुणवंत विद्यार्थ्यांच्या संघटना हळूहळू लोप पावत आहेत. न्यायालयाने दहा टक्के जागा रिक्त ठेवण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत," असे त्यांनी सांगितले.

सदावर्ते यांनी पुढे म्हटले की, त्यांचा मराठा समाजाविषयी कोणताही द्वेष नाही, मात्र काही लोक समाजाला चुकीच्या दिशेने नेत आहेत. "ब्राह्मण गरीब असणे हा गुन्हा आहे का? त्या समाजालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, मात्र त्यांना कोणतेही आरक्षण उपलब्ध नाही," असे मत त्यांनी व्यक्त केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर टीका करताना सदावर्ते म्हणाले, "आरक्षण व्यवस्थेची संपूर्ण माहिती नसताना काही वक्तव्ये केली जात आहेत. जरांगेंना आरक्षणाची बाराखडीही माहिती नाही. त्यांना कोणीतरी मार्गदर्शन करत असल्याचे दिसते."

यावेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजाचाही उल्लेख केला. आयोगाच्या अधिकाऱ्यांवर होत असलेल्या टीकेबाबत चिंता व्यक्त करत, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत येत असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. सरकारकडून आरक्षणाबाबत निर्णय जाहीर करण्यात आला असला, तरी काही प्रमाणपत्रे रद्द होत असल्याने मराठा समाजातील नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

----------


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने